आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. राजेंद्रकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यापूर्वीही २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा ११ हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देखील ते विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते परंतु पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालं नाही. लोकसभा लढवण्यास देखील ते इच्छुक परंतु पुन्हा एकदा पक्षाकडून त्यांना डावलण्यात आलं. यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची असा निर्धार केला आहे.
राजेंद्रकुमार गावित हे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून या मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपावेळी हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार हे निश्चित मानलं जात असलं तरी देखील पक्षाकडून गावित यांना तिकीट मिळणार नसल्याची चिन्ह दिसताच त्यांनी आपल्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात भाजपला धक्का बसला आहे. गावित हे इतर पक्षात गेले किंवा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर याचा फटका भाजपला बसू शकतो. परंतु नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असल्याने महायुतीच्या भूमिकेचा इथे चांगला परिणाम होऊ शकतो.