राज्यात विधानसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेताना दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. त्यातच भाजपच्या तसेच महायुतीच्या अनेक प्रस्थापित नेत्यांना आपल्या पक्षाच्या खेचून आणण्यास शरद पवारांना मोठं यश आलाय. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून इंदापूर मध्ये ही भाजपचे नेते व माजी आमदार हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, काल अखेर हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं पुढील 4 ते 5 दिवसांत हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातोय.
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनीही पितृपक्षानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करु, असे म्हटले होते. त्यानंतर घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीच हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकीता पाटील यांच्यासह शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी पोहचले. त्यात पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच या चर्चेच्या वेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. तसेच इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीचे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली आहे. व हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी देखील तुतारीचे स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसांत हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी “आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा”, अशा आशयाचे बॅनर इंदापुरात झळकले होते. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले असल्याची चर्चा आहे. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. तसेच भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत अनेक चर्चा निष्फळ ठरल्या त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तुतारीच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून उद्याच पत्रकार परिषद घेऊन ते आपल्या प्रवेशाची घोषणा करतील