लोकसभा निवडणूक पार पडली आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहायला सुरवात झाली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांमधून सर्व विधानसभा मतदारसंघात राजकीय लगबग सुरु आहे. तशीच ती पुणे शहरातील आणि संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघात देखील राजकीय हालचालींना वेग आलाय. १९९५ ते २०२३ पर्यंत सलग २८ वर्ष कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता परंतु २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा काबीज करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटणार यात तिळमात्र शंका नाही. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे कसब्याचे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, पोटनिवडणुकीत विजय मिळवून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या रविंद्र धंगेकरांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवणं अवघड असल्याचं चित्र आहे. भाजपकडून धंगकरांना कोण आव्हान देणार हे अद्याप ठरलं नसलं तरी नेमकं काय घडलं की धंगेकरांना कसबा अवघड झालाय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळं भाजपकडून उमेदवारीसाठी कोणाची चर्चा आहे? भाजपाला २८ वर्ष बालेकिल्ला राहिलेला कसबा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यात यश मिळणार का..? यासंबंधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला परिसर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात येतो. तब्बल २८ वर्ष हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला राहिला. १९९५ पासून २०२३ पर्यंत कसब्यात भाजपची सत्ता राहिली आहे. परंतु २०२३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत याच बालेकिल्ल्यात भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. १९९५ ते २०१४ पर्यंत भाजपचे जेष्ठ दिवंगत नेते गिरीश बापट यांनी या मतदारसंघावर वर्चस्व गाजवलं आहे. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना पक्षाकडून खासदारकीसाठी तिकीट दिलं व ते खासदार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या अरविंद शिंदे आणि भाजपच्या मुक्ता टिळक यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये भाजपच्या मुक्ता टिळक 28,196 मतांनी विजयी झाल्या. त्यांना 75,492 तर काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांना 47,296 मतं मिळाली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. त्यात भाजपकडून हेमंत रासने यांना तिकिट मिळालं आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर उभे होते. या पोटनिवडणुकीत धंगेकर यांचा 10,915 मतांनी विजय झाला. त्यांना एकूण 73,309 मतं मिळाली तर भाजपच्या हेमंत रासने यांना 62,394 मतं मिळाली. २८ वर्ष बालेकिल्ल्या राहिलेल्या भाजपला मात्र या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. संपूर्ण राज्यभर या निवडणुकीची चर्चा झाली. परंतु त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत हाच बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरु झाले. आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं रविंद्र धंगेकरांना उमेदवारी दिली. भाजपाकडून मुरलीधर मोहोळ उभे होते. राज्यभर महाविकास आघाडीचा जोर असताना पुण्यात मात्र, कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून धंगेकरांऐवजी मोहोळांना जादा मताधिक्य मिळालं. यामुळं भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कसबा परत मिळवण्याचा चंग भाजपानं बांधल्याचं दिसतं आहे.