पुणे । पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे मागील चार दशके अत्याधुनिक व वाजवी दरात वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम करित आहे. हीच परंपरा कायम ठेवत पूना हॉस्पिटलमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘डिपार्टमेंट ऑफ होमिओपॅथी’ आणि ‘नवीन आयुर्वेद ओपीडी’ यांचे उदघाटन करण्यात आले. डॉ. भूषण पटवर्धन, राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक – AYUSH आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. नव्याने सुरू करण्यात आलेल्या होमिओपॅथी विभागाद्वारे वरिष्ठ डॉक्टारांद्वारे होमिओपॅथिक सल्ला व उपचार प्रदान केले जातील. तसेच, नवीन आयुर्वेद ओपीडीद्वारे प्राचीन आयुर्वेद तत्वांवर आधारित तज्ञ आयुर्वेदिक सल्ला व उपचारांद्वारे रुग्णांचे आरोग्य सुधारण्याचे प्रयत्न केले जातील.
या कार्यक्रमात पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देवीचंद जैन यांनी डॉ. भूषण पटवर्धन यांचा सत्कार केला. मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया यांनी प्रस्तावना केली. डॉ. भूषण पटवर्धन यांनी रुग्णालयात इतर मोठमोठ्या विभागांबरोबरच आयुर्वेद विभागही सुरू करून पूना हॉस्पिटलने एक नवीन आदर्श घालून दिला आहे असे सांगून या वैकल्पिक औषधांचा प्रचार करण्यासाठीच्या रुग्णालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी या पारंपरिक व आधुनिक आरोग्यसेवा पद्धतींचा अधिक व्यापक प्रमाणात रुग्णांना फायदा होईल व आज अनेक हॉस्पिटल्सच्या तुलनेत पूना हॉस्पिटल हे खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक स्तरातील माणसांसाठी तितक्याच तत्परतेने कार्यरत आहे असे नमूद केले. यावेळी समारंभाच्या व्यासपिठावर, रूग्णालयाचे अध्यक्ष देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी राजकुमार चोरडिया, जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी पुरूषोत्तम लोहिया, विश्वस्त राजेश शाह, नैनेश नंदू, सुजय शाह, पूना हॉस्पिटलचे सी ई ओ डॉ. रवींद्रनाथ उपस्थित होते. तसेच पूना हॉस्पिटलचे डॉक्टर्स व आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पूना हॉस्पिटलचे विश्वस्त राजेश शाह यांनी आभार व्यक्त यांनी केले.