महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. या निवडणुकीत पुन्हा आपलं सरकार आणण्यात महायुतीला यश आलं. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं. लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतं देऊन विजयी केलं खरं पण यंदा विधानसभेतील महिला आमदारांची संख्या मात्र घटली आहे. महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी भूमिका सर्वच पक्ष मांडतात मात्र प्रत्यक्षात महिलांना संधी देताना सर्वच पक्ष हात आखडता घेतात असं चित्र दिसतं. यावेळी किती महिला उमेदवार निवडणुकीच्या रींगणात होत्या. कोणत्या पक्षाने किती महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं. मागच्या वेळच्या निवडणुकीत विधानसभेत किती महिलांना संधी मिळाली होती आणि आता किती महिला आमदारांचा विधानसभेत आवाज घुमणार आहे ? यासह १९६२ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत महिला उमेदवारांची संख्या किती होती आणि त्यातील किती विजयी झाल्या होत्या याची आकडेवारी देखील आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
या विधानसभा निवडणुकीत एकीकडे लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला असताना दुसरीकडे महिला उमेदवारांनाच नाकारल्याचं चित्र आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार या निवडणुकीत एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २५० च्या जवळपास महिला उमेदवार होत्या. म्हणजेच एकूण उमेदवाराच्या सहा ते सात टक्केच महिलांना संधी मिळाली. आता निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्याही ७ टक्क्यांच्या घरातच आहे. २३ नोव्हेंबरला झालेल्या मतमोजणीत २५० पैकी फक्त २१ महिला उमेदवार विजयी ठरल्या. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्वाधिक महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. भाजपाच्या १४ महिला उमेदवार जिंकून आल्या. यातील १० महिला उमेदवार या पुन्हा एकदा विजयी झाल्या आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघातून श्वेता महाले, जिंतूरमधून मेघना बोर्डिकर, नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, दहीसरमधून मनीषा चौधरी, गोरेगाव येथून विद्या ठाकूर, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, शेवगावमधून मोनिका राजळे आणि केजमधून नमिता मुदंडा यांचा समावेश आहे. भोकर मतदारसंघातून श्रीजया चव्हाण, कल्याण पूर्वमधून सुलभा गायकवाड, वसईममधून स्नेहा पंडित, फुलंब्रीमधून अनुराधा चव्हाण या नव्या महिला उमेदवारांनीही यंदा दणदणीत विजय मिळवलाय. साक्रीतून मंजुळा गावित, कन्नडमधून संजना जाधव या शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून निवडून आल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे, अनुशक्तीनगरमधून सना मलिक तर श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांचा विजय झालाय. काँग्रेसच्या केवळ एका महिला उमेदवाराला विजय मिळवता आला आहे. धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विजयी झाल्या आहेत. काँग्रेसने ९ महिला उमेदवारांना तिकीट दिलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने १० तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ११ महिला उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. पण त्यातील एकाही महिला उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. भाजपचे एकूण १३२ आमदार निवडून आले. या संख्येच्या तुलनेत भाजपच्या केवळ १४ महिला उमेदवार आमदार म्हणून विजयी झाल्या. महायुती आणि महाविकास आघाडी मिळून केवळ २१ महिला आमदार विजयी झाल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपाने १२ महिला उमेदवारांना संधी दिली होती. तर, शिवसेनेने ९, काँग्रेसने १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ९ महिला उमेदवारांना संधी दिली होती. म्हणजेच मुख्य प्रवाहातील पक्षांनी ४५ महिला उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त २४ महिला उमेदवार जिंकल्या. २८८ सदस्यांच्या विधानसभेत फक्त २४ महिला आमदार म्हणजेच फक्त ८ टक्के महिला आमदार होत्या. तर यावेळी २१ महिला उमेदवार जिंकल्याने ही टक्केवारी ७ टक्क्यांवर आली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये राज्यात ३३ टक्के महिला आरक्षणाचा ठराव पास करण्यात आला. पुढची जनगणना झाल्यानंतर ३३ टक्के आरक्षणाचे बिल अंमलात येणार आहे. तेव्हा सभागृहात २८८ पैकी ९६ महिला आमदार असणं अपेक्षित असेल. त्यामुळे सभागृहात महिला प्रतिनिधींचा आवाज वाढवण्याकरता आता २०२९ च्या निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.