विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका मांडू लागली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आपण स्वतंत्र लढलं पाहिजे असं म्हटलंय. त्यांच्यासह अनेकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वतंत्र लढलं पाहिजे अशी भूमिका मांडलीय. विधानसभेचं गणित बदलल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नेमकी कोणती चलबिचल सुरु आहे. कोण काय भूमिका मांडतंय तर कोण मौन बाळगून आहे ? महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कशी सामोरी जाणार ? जर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडली तर पुढच्या निवडणुका एकट्यानं लढवणं सोयीस्कर जाईल की अडचणीचं ठरू शकतं ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवावर सध्या महाविकास आघाडीमध्ये विचारमंथन चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण एकीकडे पक्षातील वरिष्ठ पराभवाची कारणं शोधण्यात व्यग्र असताना पक्षातून नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच सूर उमटू लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये आपण स्वतंत्र लढावं असा सूर महाविकास आघाडीतून समोर येऊ लागला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतंत्र लढण्याचा विचार बोलून दाखवला होता. त्याला आता काँग्रेसमधूनही दुजोरा मिळू लागला आहे. काँग्रेस नेते व माजी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र लढण्याबाबत पक्षातून काहींनी मत व्यक्त केलं असलं तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असं स्पष्ट केलं आहे. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण ही सगळी त्यांची वैयक्तिक मतं आहेत. ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा आढावा घेत आहोत. त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचालीबाबत निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमधूनही स्वतंत्र लढण्याची भूमिका मांडली जात आहे. परंतु, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून मात्र याबाबत कुठलीही चर्चा समोर आली नाही. पक्षाकडून अद्याप महाविकास आघाडीचं भवितव्य किंवा स्वतंत्र लढण्याबाबतची भूमिका याबाबत अद्याप कोणतंही अधिकृत विधान करण्यात आलेलं नसल्यामुळे शरद पवार नेमका काय विचार करीत आहेत याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत.