महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ११ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट केला जाणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महायुती सरकारमध्ये सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या वाट्याला 22 ते 23, शिंदे सेनेला 12 ते 13 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आठ ते नऊ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकालाच संधी मिळेल असं नाही. परंतु ज्या नेत्यासाठी वरिष्ठ पातळीवर वातावरण अनुकूल असेल अशांना संधी मिळू शकते. राज्याच्या राजकारणातील महत्वाचा जिल्हा असलेल्या बीड जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरु आहे. बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोन्ही बहीण भावाचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. या स्पर्धेत सुरेश धस आणि प्रकाश सोळंके देखील आहेत. परंतु सर्वाधिक चर्चा मुंडे बहीण भावाच्या नावाची रंगली आहे. मुंडे बहीण भाऊ दोघंही मंत्री कसे काय होऊ शकतात? याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
धनंजय मुंडे यांनी दोन वेळा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळलं असल्याने त्यांची पुन्हा वर्णी लागून त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद येईल असं मानलं जात आहे. मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही निकटवर्तीयांपैकी एक आहेत. आक्रमक वक्ते, कुशल संघटक आणि मोठ्या फरकाने विजय या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तसेच यापूर्वी मंत्रिपद भूषवल्याने तो अनुभव ही त्यांच्या पाठीशी आहे. परंतु मंत्रिपदासाठी पंकजा मुंडे यांच्याही नावाची चर्चा आहे. पंकजा मुंडेंना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून पक्षाकडून अनेकदा डावलण्यात आल्याच्या बातम्या आपण गेल्या पाच वर्षात पाहिल्या आहेत. त्यांनीही अप्रत्यक्षपणे अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून त्यांना विधानपरिषदेवर आमदारकी देऊन त्यांचं राजकीय पुर्नवसन करण्यात आलं. आता मंत्रिपदासाठीही त्यांचं नाव चर्चेत आहे. पंकजा मुंडे यांना दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यांच्यामागेही मोठा जनाधार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपल्या नेत्याचा पराभव सहन न झाल्याने त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या केल्या. मुंडे या ओबीसी समाजातील भाजपचं एक प्रबळ नेतृत्व आहेत. त्या आक्रमक नेत्या आहेत. पंकजा मुंडेंनी या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राज्यभरातील विविध उमेदवारांचा प्रचार केला. महायुतीचं सरकार आलं तर पंकजा मुंडे मंत्री होतील असा उल्लेख सभांमधून त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांनी केल्याचं पाहायला मिळालं आहे.