महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे नार्वेकरांची एकमताने विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. विधानसभा अध्यक्षपद हे शक्यतो एखाद्या ज्येष्ठ नेत्याला दिले जाते. परंतु नार्वेकर हे ज्येष्ठ नाहीत. तरीदेखील ते विधानसभा अध्यक्ष कसे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तेव्हा त्यांना देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला होता. आता पुन्हा एकदा नार्वेकरांनाच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आलंय. भाजपकडून कुलाबा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार राहुल नार्वेकर हे यंदा मंत्रिपदासाठी इच्छुक होते मात्र नार्वेकरांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नाला टाचणी लागली आहे. आता ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळतील. अडीच वर्षाच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या नार्वेकरांचा राजकीय इतिहास कसा राहिला आहे. त्यांनी शिंदे सरकारमध्ये अडीच वर्ष अध्यक्षपदाचा कार्यकाळ कसा सांभाळला? याविषयी आपण या व्हिडिओतून जणू घेणार आहोत.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि चिन्हावरून झालेल्या वादावेळी नार्वेकरांची कसोटी लागली होती. शिंदे गटाला ‘मूळ राजकीय पक्ष’ म्हणून घोषित करणारा निर्णय दिल्याने विरोधकांनी राहुल नार्वेकरांविरोधात प्रचंड टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी मी क्रांतिकारक निर्णय देणार असं विधान करून नार्वेकरांनी खळबळ उडवून दिली होती. आमदार अपात्रता प्रकरणात कुणालाच डिसक्वालिफाय न करण्याचा निर्णय त्यांनी दिला होता. विधानसभेचे अध्यक्ष निष्पक्षपाती नाहीत असा आरोप ही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात राहुल नार्वेकर हे चर्चेत राहिले. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलंय. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. नार्वेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम नार्वेकर करायचे. एकप्रकारे ते न्यूज डिबेटमध्ये शिवसेनेचा चेहरा होते.