लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ १६ आमदार निवडून आणता आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसने नाना पटोले यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे निवडणुकीतील पराभवाचं खापर देखील त्यांच्यावरच फोडण्यात आलं. दरम्यान आता पदमुक्त होण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडे नाना पटोले यांनी पत्रव्यवहार केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान यावर नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे.
राजीनाम्याबाबत नाना पटोले यांनी म्हटलं की, हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर खुल्या पद्धतीने चर्चा करण्याची गरज नाही. काँग्रेस पक्ष वेळोवेळो जो निर्णय घेते तो कळवते आता घेतलेले निर्णय तुम्हाला कळेलच असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष पदाला सोडचिठ्ठी देऊन या पदासाठी दावा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत विचारले असता चर्चा कोणीही काहीही करू शकते त्याला थांबवता येत नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची माझी आजवरची परंपरा आहे. पक्षाचा आदेश सर्वांना मान्य असेल असंही ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, जे राज्यातले प्रमुख नेते असतात, त्यांची जबाबदारी असते. ते पराभवासाठीही जबाबदार असतात आणि विजयासाठीही जबाबदार असतात असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. यावर नाना पटोलेंनी म्हटलं की, ही जबाबदारी सर्वांची आहे, विषय श्रेयवादाचा नाही तर आत्मचिंतनाचा आहे. महाराष्ट्राची जनता बॅलेटवर मतदानाची मागणी करत आहे. या मुद्द्यावर सर्वांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. आमच्या मतावर निर्माण होणारे सरकार आम्हाला दिसलं पाहिजे अशी राज्याच्या जनतेची भावना आहे. लोकांची ती लढाई लढणे आता आवश्यक आहे असंही पटोले म्हणाले.