पुणे : यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्यामुळे देशभरात अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे तांदूळ, गहू, डाळी आणि कडधान्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. पुण्यातील घाऊक व्यापाऱ्यांनी ग्राहकांना नैसर्गिकरित्या साठवलेले, रसायनमुक्त आणि शुद्ध सात्त्विक अन्नधान्य वर्षभरासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
पूर्वी ग्राहक नवीन हंगामातील धान्य वर्षभरासाठी साठवून ठेवत. मात्र, बदलत्या काळात गरजेप्रमाणे खरेदी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, व्यापाऱ्यांना अन्नधान्य दीर्घकाळ साठवावे लागते आणि त्यासाठी कीटकनाशके वापरण्याची गरज निर्माण होते. नैसर्गिकरित्या साठवलेले धान्य आणि डाळी शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
तांदूळ आणि गव्हाच्या दरात मोठी घट
यंदा तांदळाचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढले असून, बासमती वगळता इतर सर्व तांदळाचे दर कमी झाले आहेत. तसेच, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून नवीन गहू मोठ्या प्रमाणात बाजारात येत असून, त्याचाही दर कमी आहे.
सध्या अन्नधान्याचा पुरवठा मुबलक असला तरी हळूहळू साठा कमी होत जाईल आणि दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहिणींनी या संधीचा लाभ घेत वर्षभरासाठी गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, साबुदाणा, शेंगदाणे यांची खरेदी करून ठेवावी, असे मत राजेंद्रकुमार मोहनलाल कंपनीचे यश बाठिया यांनी व्यक्त केले.
फ्युमिगेशनविरहित धान्य दीर्घकाळ टिकू शकते
फ्युमिगेशन न केलेले धान्य आणि डाळी तेल लावून योग्य प्रकारे साठवल्यास वर्षभर टिकतात. त्यामुळे ग्राहकांनी योग्य विचार करून मोठ्या प्रमाणात खरेदी करणे फायदेशीर ठरणार आहे. शुद्ध सात्त्विक अन्नामुळे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याची संधी मिळते.
सर्व अन्नधान्य छोट्या आणि मोठ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असल्याने ग्राहकांना खरेदी सोयीस्कर होत आहे. तसेच घरपोच सेवेमुळेही ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे, असे मत आर.एम. ग्रुपचे संचालक आणि दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केले.