मुंबई | शिंदे गटासोबत युती करून राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र आत्ता सत्तेत आलेल्या शिंदे गटाला सुरुंग लावतोय की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात सारं काही योग्य नसल्याची माहिती समोर येते आहे. ओवळा माजीवाडा मतदारसंघावरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचं कळतंय.
आमदार प्रताप सरनाईक यांनी आपला ओवळा माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरनाईकांवर दबाव टाकत असल्याचं कळतंय. भाजपकडून प्रताप सरनाईक यांच्या समर्थकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहे. सरनाईकांना हे समजताच त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन जाब विचारला असता त्याचवेळी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. यात धक्कादायक बाब म्हणजे, शिंदे गटात सामील होऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यामागील ईडीचा फेरा संपला असं दिसत होतं, पण त्यांना पुन्हा एकदा ईडी कारवाईचा धाक दाखवून, पुन्हा चौकशी सुरु करण्याची धमकी दिल्याचं समजतंय. सध्या तरी या वादावर शिंदे आणि सरनाईकांकडून अजूनही कुठलंही स्पष्ट भाष्य करण्यात आलेलं नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच आणि जवळच्या आमदारातच भाजपनं सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
माध्यमांमध्ये अंतर्गत वादाच्या बातम्या आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका कार्यक्रमात गर्दीत बसलेल्या प्रताप सरनाईकांना मंचावर बोलवून घेतलं आणि शिंदे गटात सगळ आलबेल असल्याचं दाखवून दिलं.
एकीकडे माध्यमांमध्ये शिंदे-सरनाईक यांच्यातील बातम्या येऊ लागल्यानंतर आमदार प्रताप सरनाईकांचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक यांचं ट्विटही चर्चेत आलंय. या ट्विटमध्ये पूर्वेश यांनी सरनाईक-शिंदे दोघांचे फोटो शेअर केलेत आणि त्याला दिलेल्या कॅप्शनमधून त्यांनी शिंदे-सरनाईक वादाच्या चर्चांवर भाष्य केलंय. दो दिल और एक जान है हम…! , असं पूर्वेश सरनाईकांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय आणि एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांना टॅग केलंय.