नवी दिल्ली : बंडखोरी करून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे सरकारचे राजकीय वजन वाढताना दिसत आहे. त्यातच आता मोदी सरकारने शिंदे गटावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या नेत्यांमध्ये राजकीय मतभेद होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे अनेक आमदार, खासदारांना सोबत घेत शिवसेनेतून बाहेर पडले. याच आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपशी युती करून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. इतकेच नाही तर त्यांनी शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनाही सोबत घेतले. त्यानंतर शिंदे गटाचे मोदी सरकारमध्ये विशेष स्थान निर्माण होताना दिसत आहे. यापूर्वी लोकसभेत शिवसेना गटनेतेपद खासदार राहुल शेवाळे यांना मिळाले. त्यानंतर आता शिंदे गटाकडे मोठी जबाबदारी दिली जात आहे.
दरम्यान, प्रतापराव जाधव हे बुलडाणा जिल्ह्याचे खासदार आहेत. त्यांनी विधानसभा, लोकसभेचे प्रतिनिधित्त्व केले आहे. 1989 पासून बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना पक्षाला मोठं करण्याचे त्यांनी काम केले.