नवी दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे सोमवारी (दि.10) सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. मुलायम सिंह यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा होता. त्यामुळेच ते पंतप्रधान होणार अशी दोनदा परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री आणि आठवेळा आमदार, सातवेळा खासदार असा राजकीय अनुभव असलेले मुलायम सिंह यादव पंतप्रधान होण्यास इच्छुक होते. मात्र, राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालू प्रसाद यादव आणि शरद यादव यांच्यासह काही नेत्यांनी त्यांना पंतप्रधान होण्यास विरोध केला होता. त्यामुळेच ते या पदावर पोहचू शकले नव्हते.
1996 ला पहिल्यांदा पंतप्रधान होण्याची संधी हुकली
1996 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यावेळी दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. भाजपला 161 जागांवर विजय झाला. मात्र, बहुमतापासून दूर असल्याने अवघ्या 13 दिवसांत अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळले. त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा नवा पंतप्रधान कोण असेल याची चाचपणी सुरु झाली. काँग्रेसकडे 141 जागा होत्या. मात्र, काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करण्यास तयार नव्हती. तेव्हा व्ही. पी. सिंह, ज्योती बसू या नेत्यांची नावे चर्चेत होती. पण म्हणावी तशी पसंती त्यांना मिळाली नाही. त्यानंतर लालू प्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांचे नाव सर्वात पुढे होते. पण नेमकं तेव्हाच चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यांचे नाव आल्याने त्यांचं नाव मागे पडले.
मुलायम सिंह यादव हे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. इतकेच नाहीतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्याचप्रकारचा उत्साह देखील होता. मात्र, त्यावेळी लालू यादव आणि शरद यादव यांनी त्यांच्या नावाला विरोध केला. त्यानंतर अनपेक्षितपणे त्यांचे नावही मागे पडले अन् एच. डी. देवगौडा हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. मुलायम सिंह यादव यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली.
1999 ला पुन्हा संधी हुकली
1999 मधील लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन ते संसदेत गेले. त्यानंतर त्यावेळीही त्यांचं नाव पुन्हा पंतप्रधानपदासाठी चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी यादव नेत्यांसह इतर नेत्यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान झाले नाहीत. त्यांनी पंतप्रधान न होण्याची खंत अनेकदा बोलूनही दाखवली होती. त्यांनी पंतप्रधान न बनण्यामागे लालू प्रसाद यादव, शरद यादव, चंद्राबाबू नायडू आणि व्ही. पी. सिंह असल्याचे अनेकदा बोलून दाखवले होते. अशाप्रकारे मुलायम सिंह यादव पंतप्रधान होता होता राहिले आणि त्यांचे स्वप्न स्वप्न राहिले.