मुंबई | गावकीच्या राजकारणात अत्यंत चुरशीची लढत होत असते. राज्यातील जवळपास १०७९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी कोण याचा निकाल आज ठरणार आहे. तर एकूण ८७ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंचाची निवड झाली आहे. तर उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये कोणाच्या पारड्यात गुलाल असेल हे पाहावं लागेल.
राज्यातील १८ जिल्ह्यातील ११६५ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यासाठी काल मतदान पार पडले असून ८६ ग्रामपंचायतीवर बिनविरोध सरपंच निवडला गेला. तर उरलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. तर यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, शिवसेनच्या दोन्ही गटाचे नाव आणि चिन्हाच्या बदलानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थेट जनतेतून सरपंच निवडीचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सरकारने मंजूर केला होता. या निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड जनतेतून होणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालावर लागलेले आहे.