नागपूर | गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्त झाला आहे. राज्य सरकारने दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यामध्ये जमा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
राज्यातील शेतकरी हा अतिशय बिकट परिस्थितीचा सामना करत आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे.शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेलीच नाही. पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
दरम्यान, अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते. पण, तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तत्काळ दहा हजारांची रोख मदत दिली व नंतर १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आघाडी सरकार येताच सर्वप्रथम शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. अटी, शर्थी, नियमांचे अडथळे निर्माण करुन शेतकऱ्याला ऑनलाईनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो, असा आरोपही त्यांनी केला.