मुंबई | महाविकास आघाडीनंतर सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारने कोविडमुळे सणांवर लावलेले निर्बंध उठवले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने सर्वच सण निर्बंध मुक्त साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. यामुळे आता दिवाळी सण देखील निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार आहे. यंदा दिवाळीत मुंबई शहर विद्युत रोषणाईने सजनार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दिवाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेले ठाणे शहर दरवर्षी विद्युत रोषणाईने सजवले जाते. अशात आता ठाण्याच्या धर्तीवर दिवाळीत मुंबई शहरात देखील न भूतो न भविष्यती अशी विद्युत रोषणाई मुंबई पाहायला मिळणार आहे.
तसेच राज्यातील दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनकार्ड असणाऱ्या जनतेची दिवाळी आनंदात जावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील एक कोटी 80 लाख गोरगरीबांना दिवाळी फराळासाठी लागणारे आवश्यक साहित्य 100 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. रेशन दुकानात हे साहित्य मिळणार आहे.
प्रत्येक पिवळे रेशन कार्डधारकांना रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर पामतेल यांचा समावेश असलेले कीट मिळणार आहे. राज्यातील 1 कोटी 80 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. या योजनेसाठी येणाऱ्या एकूण 486 कोटी 94 लाख खर्चासदेखील मान्यता देण्यात आली आहे.