पुणे | राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता टाटा-एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे राजकारण आणखीनच तापले आहे. त्यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन बोलावं. या सरकारने ते थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. या नाकर्तेपणाला कोण जबाबदार आहे?, असा सवाल उपस्थित केला आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील नियोजित चार प्रकल्प गुजरातला नेले आहेत. त्यामुळे मोदी सरकारवर आणि भाजपवर टीका केली जात आहे. अजित पवार यांनीही याच मुद्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, 8 सप्टेंबर 2021 ला केंद्र सरकारने एअरबस कंपनीसोबत करार केला होता. मग आता असं काय झालं की प्रोजेक्ट गुजरातला नेला जात आहे. दरवेळी प्रकल्प गेला की हे सांगतात जाऊद्या. आपण आणखी मोठा आणू. आता तर म्हणतात हा प्रकल्प आलाच नव्हता. हे काय चाललंय? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन बोलावं. सरकारची भूमिका मांडावी. ओळीने चार प्रकल्प गुजरातला गेले. या सरकारने ते थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. या नाकर्तेपणाला कोण जबाबदार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, टाटा-एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?”