पुणे | सध्या पुण्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. त्यामध्ये कसबा पेठ निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढला आहे. आज महाविकास आघाडीच्या युवक नेत्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील सहभागी झाले होते.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असतानाही अजून फिरत आहेत अशी टीका केली होती. त्यावर बोलताना रोहित पवार यांच्या संतापाचा पारा चढला. कोण म्हणलं? कोण चंद्रकांत पाटील? शरद पवार यांना सल्ले देणारे कोण आहेत ते? चंद्रकांत पाटील यांना किती महत्व दयायचे असा संताप व्यक्त केला. पवार साहेब अजूनही मनाने आणि हृदयाने तरुण आहेत. त्यांच्यात क्षमता आहे. युवकांसारखे ते फिरतात ही त्यांची ताकद आहे.
परंतु, लोकांनी भाजपला नाकारायचे ठरवले आहे. त्यामुळेच एका मोठ्या नेत्याला आजारी असतानाही व्यासपीठावर आणण्यात आले. माणुसकी जपणे महत्वाचे आहे असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.