सांगली | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते, खासदार संजय राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांनतर अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली. हा वाद सुरु असताना राऊतांनी मात्र आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे.
यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांविषयी बोलणं योग्य नाही, पण जर जनतेच्या भावना असतील तर काय करणार. संघर्ष करणारा शिवसैनिक आहे. स्वतः उपाशी राहून तुम्हाला आमदार-खासदार केलं. खरे शिवसैनिक इथेच आहेत आणि निवडून दिलेले 50 खोके घेवून पळून गेले. शिवसेना त्यांची आहे असे आता निवडणूक आयोग सांगत आहे. अरे तुमच्या बापाची आहे का भो***ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना आणि भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे.
त्याचबरोबर, चाळीस चोरांनी आणि दिल्लीच्या रंगा बिल्लांना काय वाटतं? निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. पण, शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत महाविकास आघाडीचे राज्य आणायचंय. जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचे आक्रमण झाले, त्यावेळी काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. भाजपने पाठीत खंजीर खुपसलं. हे भांडण 40 चोरांशी नाही, भाजपशी आहे’, असंही ते म्हणाले.
दरम्यान, संजय राउतांच्या या विधानामुळे पुन्हा राज्यात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.