मुंबई | सध्याच्या राजकारणातील होणाऱ्या घडामोडी आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीमध्येच एकमेकांत असलेली चकमक देखील पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील महाविकास आघाडी मजबूत असल्याचे सांगणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतलेले आमचे उमेदवार परत करावेत अशी मागणी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली आहे. महाडमधील स्नेहल जगताप यांना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसचे अनेक नेत्यांना पक्षात घेणे सुरु केले आहे. आघाडीसाठी हे योग्य नसल्याची भूमिका नाना पटोले यांनी यावेळी मांडली. आमचे घेतलेले उमेदवार या पक्षांनी परत करावेत अशी मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान या आठवड्यामध्ये राज्यात मोठ्या घटना घडणार असल्याचे सांगताना राज्य सरकार पडेल असे पटोले यांनी सांगितले. जरी सरकारकडे बहुमत असल्याचा दावा होत असला तरी मुख्यमंत्री अपात्र झाल्यावर सरकार कोसळणार असा दावा त्यांनी केला. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या म्हणण्यानुसार पुढील सहा महिने शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहू शकतात, याची चिरफाड करत शेड्युल 10 प्रमाणे या निकालानंतर सरकार पडेल आणि मुख्यमंत्री सहा वर्षासाठी अपात्र ठरतील, अशावेळी ते पुढील सहा महिने कसे राहतील असा सवालही पटोले यांनी विचारला.