सध्या सगळीकडे आयपीएलची चर्चा सुरू आहे. मात्र, आयपीएल फायनल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत टी20 विश्वचषक सुरू होणार आहे. 2 जून पासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीवर या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होत आहे. या 20 संघांना प्रत्येकी 5 संघांच्या 4 गटात विभागण्यात आलंय. 2022 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 16संघ सहभागी झाले होते. यावेळी मात्र, स्पर्धेचे आयोजक असणाऱ्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज वगळता अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, आयर्लंड, नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, युगांडा आणि कॅनडा हे संघ दिसणार आहेत.
या स्पर्धेपूर्वीच यंदाच्या विश्वचषकात कोणते खेळाडू चांगली कामगिरी करणार याची चर्चा सुरू झालीये. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, डेव्हिड मिलर, केन विल्यमसन, जोस बटलर, वानिंदू हसरंगा, आंद्रे रसेल, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र या खेळाडूंव्यतिरिक्त विश्वचषकाच्या स्पर्धेत काही नवीन खेळाडू त्यांच्या कामगिरीने चाहत्यांना आश्चर्यचकित करू शकतात. यामध्ये यूएईचा कार्तिक मयप्पन, युगांडाचा फिरकी गोलंदाज फ्रँक नुबुगा, कॅनडाचा पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज साद बिन जफर, नेपाळचा कुशल मल्ला आणि दीपेंद्र सिंह एरी यांचा समावेश आहे.
या खेळाडूंचा इतिहास पाहिला तर, यूएईच्या कार्तिक मयप्पनने 2022 च्या टी-20 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. नेपाळच्या कुशल मल्लाने टी-20 मध्ये अवघ्या 34 चेंडूत शतक झळकावले आहे, तर दीपेंद्र सिंह ऐरी याच्या नावावर दोन वेळा सलग 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवघ्या 9 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. हांगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील या खेळीदरम्यान त्याने सर्वात कमी चेंडूंवर अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केलाय. अवघ्या 9 चेंडूत 50 धावा पूर्ण करत त्याने 12 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा युवराज सिंगचा विक्रम मोडला होता.
दीपेंद्र सिंगच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे. 27 सप्टेंबर रोजी आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने 10 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 52 धावांची नाबाद खेळी केली होती. या कालावधीत, त्याचा स्ट्राइक रेट 520.00 होता, जो आत्तापर्यंतचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये मधील सर्वोच्च स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात दीपेंद्र सिंह ऐरीच्या परफॉर्मन्सवर सगळ्यांची नजर असणार आहे.