मुंबई | महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या नवीन एकनाथ शिंदेंच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकराच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी विभागीय पातळीवर कामही सुरु झाले आहे. सहा हजार रुपये अनुदान देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आधीच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे मिळून १२ हजार रुपये मिळू शकणार आहे.
दरम्यान योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्यात देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्यासाठी काय अटी असणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. शिवाय केंद्र सरकारच्या अटी मुख्यमंत्री किसना योजनेला लागू होणार का, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.