तो येतो, तो भाला फेकतो आणि तो जिंकतो. ऑलिम्पिक चॅम्पियन आणि आता विश्वविजेता, नाव एकच नीरज चोप्रा. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये नीरज चोप्राने फक्त गोल्डच नाही तर भारतीयांची मने सुद्धा जिंकली. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तर 2021 मध्ये भारताला ट्रॅक आणि फील्डमध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक सुद्धा जिंकून दिलेले. अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसराच भारतीय आहे. भाला फेकणे आणि विक्रम करणे या एकाच समीकरणावर नीरज चोप्रा मैदानात उतरतो.
नीरज चोप्राचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणातील पानिपत येथे झाला. पठ्याचं शालेय शिक्षण गावाकडेच झालं. शिक्षणात त्याला काडीचाही रस नसल्याचं तो सांगतो. एका मुलाखतीत त्याला विचारले गेले की तू एक अॅथ्लीट नसता तर काय असता? यावर त्याने सहज आणि निरागसपणे उत्तर दिले की “गावाकडे गाया – म्हशी चारत असतो.”
लहानपणी वजन जास्त असल्याने त्याचे मित्र त्याला त्रास द्यायचे. यामुळे त्याच्या वडिलांनी सरावासाठी त्याला मैदानात पाठवले तिथे काही खेळाडूंना भाला फेकताना पाहून तो सुद्धा या खेळाकडे आकर्षिला गेला. यादरम्यान भालाफेकपटू जयवीर चौधरी यांना समजले की नीरज आणि भाल्याचं नात आवडी निवडीच्या पलीकडच आहे. तो एक चॅम्पियन आहे हे त्यांनी ओळखले आणि त्याला प्रोत्साहन दिले. नीरजने अनेक कनिष्ठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा एकहाती गाजवल्या, अनेक विक्रमही रचले. पण तरीही 2018 च्या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेतील गोल्डची आणि २०२१ च्या टोकियो ऑलिंपिकच्या गोल्डची गोष्ट काही वेगळीच आहे. ऑलिंपिक मॅचच्या दरम्यान तर संपूर्ण देशाच्या नजरा एकट्या नीरजवर होत्या आणि त्यानेही कोणाला निराश केले नाही. आज तब्बल दोन वर्षानी त्याने पुन्हा तेच केले. तो आला आणि तो जिंकला.
नीरज चोप्रा फक्त मैदानातच नाही तर मैदाना बाहेर सुद्धा चॅम्पियन आहे. त्याचा साधेपना, हसरा चेहरा, रांगडी आवाज आणि निरागस वृत्ती सगळं काही हेवा वाटाव असं आहे. स्टार म्हटलं की स्टाइल, दिखावेपणा, द्वेष, राजकारण आणि बाजारूपन येतच. पण नीरज चोप्रा यात कधीच पडला नाही. आपलं मैदान आणि आपली मेहनत या दोनच गोष्टीत तो रमतो. पण एखादी गोष्ट चुकीची असेल तर तो त्याला चूक म्हणायला लाजत नाही. टोकियो ऑलिंपिकच्या दरम्यान भारत- पाक वाद सुरू झालेला, त्यावेळेस त्याने स्पष्ट शब्दात संगीतले होते की मला यापासून दूर ठेवा आणि यात माझं नाव वापरू नका. इतकच नाही तर देशात कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सुद्धा त्याने भाष्य केलं आणि पारदर्शक तपासाची मागणी केली. विशेष म्हणजे या आंदोलनावर देशातल्या सर्वच प्रमुख तथाकथित स्टार्सनी मौन पाळले होते, मंग ते क्रिकेटरस असो वा फिल्मी स्टार कोणी चकार शब्द ही काढला नाही. या अशा वातावरनात नीरज चोप्रा ने केलेले वक्तव्य त्याची खिलाडू वृत्ती दाखवते.