एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यांना निधी देण्यात आले यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावेळी २५ जुलैला नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सदनांतील भाजपच्या खासदारांची भेट घेतली. बिहार आणि आंध्रप्रदेश राज्याला जास्त निधी देण्यात आला तर महाराष्ट्राला कमी निधी देण्यात आला यावरून महाराष्ट्रतल्या विरोधक आमदारांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यात आलं होत. अर्थसंकल्पामध्ये बिहार व आंध्र प्रदेशच नव्हे तर महाराष्ट्रासारख्या राज्यांसाठी देखील विकासासाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ही बाब लोकांपर्यंत पोहोचवून विरोधक करत असलेला चुकीचा प्रचार मोडून काढा, अशी सूचना नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासारख्या विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राज्याच्या तोंडाला पाने पुसल्याची तीव्र टीका राज्यातील विरोधी खासदारांनी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील भाजपा खासदारांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, अनिल बोंडे, अशोक चव्हाण व इतर खासदार देखील उपस्थित होते. यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील नव्या खासदारांची मोदींनी चौकशी केली. संसदेच्या कामकाजाविषयी देखील नरेंद्र मोदी यांनी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन लोकांचे प्रश्न मांडावेत अशी सूचना देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.