पुणे । गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी ( ता. २४ ) आणि गुरुवारी (ता. २५ ) दिवसभर जिल्ह्यात धो-धो पाऊस बरसला. पुणे शहरात तर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. रात्रभर चालू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी शिरले. सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या. यासह डेक्कन,एकतानगर, पुलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिक तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना ‘दी पूना मर्चंट्स चेम्बर’कडून मदतीचा एक हात पुढे करण्यात आला आहे.
पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ‘दी पूना मर्चंट्स चेम्बर’ने सामाजिक बांधीलकीची जाण ठेऊन आज पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाकडे जेवणाचे पॅकेट्स सुपूर्त केले. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सुचनेनुसार ‘दी पूना मर्चंट्स चेम्बर’ने पूरग्रस्त नागरिकांना जेवणाचे पॅकेट्स उपलब्ध करून दिले आहेत. तसेच अन्य ठिकाणीही मदत पाठवण्यात आली आहे. या उपक्रमासाठी दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार , माजी अध्यक्ष राजेंद्र बांठिया , प्रवीण चोरबेले, सहसचिव आशिष दुगड, जीतो पुणेचे सचिव चेतन भंडारी, संदीप शाह , मुकेश छाजेड, संजय चोरबेले , दिनेश मेहता , शाम लड्ढा, संकेत खिवंसरा , आशिष नहार, प्रणव गुगळे, विनिता गुंदेचा व राजेंद्र गोयल यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच लायन्स क्लब इंटरनॅशनल डीस्ट्रिक्ट ३२३४ डी २ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय सारडा, लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड व जीतो पुणे चॅप्टर तर्फे आर्थिक साहाय्य करण्यात आले. याप्रसंगी महावीर प्रतिष्ठानचे विजयकांतजी कोठारी व आदेश खिंवसरा उपस्थित होते.