रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गासाठी तब्बल 15 हजार कोटी रुपये खर्च करून अपूर्ण राहिलेल्या महामार्गासाठी मनसे आक्रमक भूमिका घेतलीय. या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं यासाठी मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात झालीय. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून मनसेच्या एकूण आठ नेत्यांची ही पदयात्रा आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत याचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होणार आहे.
ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव, दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर आणि तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माहिती दिली आहे.
यांच्या नेतृत्वात निघाली यात्रा
अमित ठाकरे – पळस्पे फाटा ते खारपाडा
बाळा नांदगावकर – तरणखोप ते कासू
संदीप देशपांडे – निवळी ते वांद्री
राजू पाटील – नागोठणे ते खांब
राज ठाकरे यांनी दिला होता इशारा
दरम्यान, नुकताच पनवेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घेतला होता. यामध्ये त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका टीप्पणी केली होती. तसेच या मुद्द्यावरुन विविध प्रकारचे आंदोलन करण्याचे आदेश देखील ठाकरे यांनी दिले होते. त्यामुळे मनसेच्या या आंदोलनानंतर तरी हे प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.