महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती कारण या मतदार संघातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून शांतीगिरी महाराजांनी निवडणूक लढवली. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना तगडे आव्हान त्यांनी उभा केले होते त्यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. आता या तिहेरी लढतीत कोण अधिक सरस ठरणार हे येत्या 4 जूनला कळेल परंतु शांतिगिरी महाराज आता नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले शांतीगिरी महाराज यांनी यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. आता शांतीगिरी महाराजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीसाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभा आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांतीगिरी महाराजांचा राजकारणातील आदर्श असल्याचं ते सांगतात. याशिवाय वाराणसीमध्ये आमचा भक्त परिवार आहे असा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. शांतिगिरी महाराज हे वाराणसीत साधू महंतांची भेट घेणार आहेत. त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली मात्र ते आता भाजपला पाठींबा देत आहेत. त्यांना भाजपमध्ये जायचंय का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर देताना भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवू अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी नाशिकच्या समस्यांकडेही लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. याशिवाय महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाले असून ते आता थेट वाराणसी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी निघाले आहेत. वाराणसी हे असे शहर आहे जे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आहे. ते एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे शांतीगिरी महा राजांची तिथल्या साधू महंतांची चांगली ओळख आहे त्यांच्या याच ओळखीचा फायदा हा महायुतीला आणि मोदींना होऊ शकतो म्हणूनच शांतिगिरी महाराज त्यांच्या प्रचारास पुढे सरसावले आहेत. आता येणाऱ्या काळात म्हणजेच 4 जून ला लोकसभा निवडणुकीचा निकालावर त्यांची दिशा ठरणार असली तरी त्यांच्या ओळखीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय फायदा झाला हेही स्पष्ट होईल.