पुणे | स्वत:च्या कार्यालयात नोकरीस असलेल्या महिलेवर अश्लील व्हिडिओ काढून त्याच्या आधारे धमकावत बलात्कार करणाऱ्या सनदी लेखापालास (चार्टर्ड अकाऊंटंट) अर्थात सीए ला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेला दिले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर या व्हिडिओचा आधार घेत संबंधीत महिलेला धमकावित पुढे सातत्याने तीन वर्षे तिच्यावर बलात्कार केलेल्या नराधम सीए ला येरवडा पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी अनिरूद्ध सतीश शेठ (वय 42, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मार्च 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे. याबाबत 50 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
येरवडा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे २०१० मध्ये निधन झाल्यानंतर त्या महिलेचे २०१२ मध्ये दुसरे लग्न झाले. फिर्यादी महिलेचा दुसरा पती आणि आरोपी अनिरुद्ध शेठ एकाच अपार्टमेंटमध्ये राहायला होते. त्यावेळी त्यांचे कौटुंबिक संबंध चांगले होते. कालांतराने दुसऱ्या पती व सासूकडून त्रास दिला जाऊ लागला. त्यावेळी अनिरुद्ध शेठ फिर्यादी महिलेला सहानुभूती दाखवत असे. त्यानंतर अनिरुद्ध ने त्याच्याच ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला नोकरी दिली. नोकरीच्या निमित्ताने दररोज भेट व्हायची. क्लायंटकडे मीटिंग करण्याच्या बहाण्याने अनिरुद्ध फिर्यादी महिलेला घेऊन जात असे. दरम्यान, २२ मार्च २०१९ रोजी क्लायंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने अनिरुद्धने फिर्यादी महिलेस नेले व त्याठिकाणी गेल्यावर आपला वाढदिवस असल्याचे सांगत गुंगीचे औषध टाकलेली पेस्ट्री खायला दिली. त्यामुळे फिर्यादी महिलेस काही वेळात गुंगी आली. यावेळी अनिरुद्ध ने तिच्यावर बलात्कार केला व नग्न अवस्थेत व्हिडिओ रेकॉर्ड केला.
आरोपी अनिरुद्ध शेठ ने फिर्यादी महिलेस रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुणे, मुंबई, आलिबाग या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. या प्रकारास विरोध केल्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेस व तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे फिर्यादी महिला नैराश्येमध्ये गेली. त्यांनी हा सर्व प्रकार अखेर मुलीला सांगितला आणि मुलीने पोलिसांमध्ये तक्रार करण्यासंदर्भात फिर्यादी महिलेचे मन वळविले. त्यानंतर त्यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी अनिरुद्ध शेठ यास भारतीय दंड संहिता कलम ३७६, ३७६(२), ३७७, ३२८, ५०४ व ५०६ कलमांखाली कारवाई करीत अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.