1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यावेळी एकुण 20 संघ स्पर्धेत सहभागी झाले असून या संघांची विभागणी एकुण 4 गटात करण्यात आलीये. यावेळी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अ गटात एकत्र असल्यानं या दोन्ही संघांमधील हायव्होल्टेज सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पहायला मिळतेय.
भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्ट्र प्रतिस्पर्धी देश आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये ज्यावेळी क्रिकेटचा सामना खेळवला जातो. त्यावेळी या सामन्याची उत्सुकता जगभरात असते. याही वर्षी अशीच काहीशी उत्सिकता पहायला मिळतेय. यंदाचा भारत-पाक सामना अमेरिकेत खेळवला जात असला तरी त्याठिकाणीही चाहत्यांची गर्दी पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, यंदाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचया तिकीटाची किंमत लाखोंच्या घरात गेल्याचं पहायला मिळतंय.
रिपोर्ट्सनुसार भारत विरुद्धा पाकिस्तान सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट यूएस चलनात 2,500 डॉलर्समध्ये विकलं जातंय. 2500 डॉलर्सचं भारतीय चलनात रूपांतर केलं तर ही रक्कम 2 लाख रुपयांच्या वर जाते. भारतातून अमेरिकेत जर हा सामना बघायला कुणाला जायचं असेल तर त्याला अंदाजे हा एक सामना पाहण्यासाठी जवळपास 70 लाख रुपये मोजावे लागू शकतात असाही अंदाज एका रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आलाय. त्यामुळे सध्या 9 जून रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या तिकीटाच्या किंमतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात यापूर्वी झालेल्या सामन्यांबाबत काही दिवसांपूर्वीच एक रिपोर्ट समोर आला होता. ज्यामध्ये भारत-पाक सामन्याचे सर्वात महागडे तिकीट 1.86 कोटी रुपयांना विकले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे सर्वात महागडे तिकीट 57.15 लाख रुपयांना विकले गेले होते. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ कट्टर प्रतिस्पर्धी असल्यानं आणि केवळ आयसीसी स्पर्धेत एकमेकांसमोर खेळत असल्यानं या सामन्याच्या तिकीटाची किंमत सहाजिकपणे इतर सामन्यांपेक्षा वाढलेली पहायला मिळते. मात्र, ही किंमत जर लाखोंच्या घरात जात असेल तर सामान्य क्रिकेट चाहत्यांना हा सामना पाहणं परवडणार का असा सवाल उपस्थित होतो.