पुणे | कॉन्फ्लुएंट या स्ट्रीमिंग डेटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहसंस्थापक नेहा नरखडे या 37 वर्षीय मराठमोळ्या महिलेने भारताच्या सर्वांत कमी वयाच्या सेल्फ मेड वुमन आंत्रप्रेन्योरच्या यादीत स्थान मिळवले आहे. बुधवारी, आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 (IIFL WEALTH HURUN INDIA RICH लिस्ट) प्रसिद्ध झाली आहे, ज्यामध्ये पुण्याच्या नेहा नारखेडेच्या नावाचादेखील समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही 11 वी वार्षिक रँकिंग आहे.
विशेष म्हणजे या वर्षीच्या यादीमध्ये 735 उद्योजक हे स्वयंनिर्मित आहेत. हा आकडा सुमारे 67 % आहे. तसेच, यंदा 117 नव्या चेहऱ्यांचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हुरुन रिच लिस्टनुसार, 1,103 व्यक्ती या यादीचा भाग आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 96 ने अधिक आहे. या यादीनुसार नेहा 10 सर्वांत श्रीमंत भारतीय महिलांमध्ये 8व्या स्थानावर आहे. 37 वर्षीय नेहा नारखेडेची एकूण संपत्ती तब्बल 13 हजार 380 कोटी आहे.
नेहा नारखेडेचे पुण्यात लहानाची मोठी झाली. नेहा प्रथम पुणे विद्यापीठात गेली. तिने पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज, एससीटीआरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. जॉर्जिया टेक येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी 2006 साली तिने देश सोडला. 2007 मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर, तिने ओरॅकल आणि नंतर लिंक्डइन येथे सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने कॉन्फ्लुएंट या कंपनीची स्थापना केली. 2014 मध्ये, नेहा आणि तिच्या दोन लिंक्डइन सहयोगींनी कॉन्फ्लुएंट सुरू करण्यासाठी कंपनी सोडली.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कॉन्फ्लुएंटचे कार्यालय आहे. ही कंपनी वैयक्तिक संस्थांना अपाचे काफ्ता आधारित स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म प्रदान करते. हे त्यांना रीअल-टाइम स्ट्रीमच्या रूपात डेटामध्ये सहज प्रवेश करण्यास सक्षम करते.