पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारण्याचा कट आहे आणि हा कट आमच्या वसाहतीत होत असल्याचा फोन 112 क्रमांकावर आला. त्यानंतर पोलिस प्रशासनासह सर्वच यंत्रणांची धावपळ झाली. इतकेच नाही तर पुणे आणि मुंबई रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट करणार असल्याचेही यामध्ये सांगण्यात आले. या फोननंतर पोलिसांनी तपासणी केली असता हा कॉल फेक (Fake Call) असल्याचे दिसले. याप्रकरणी देहू रोड पोलिसांनी अशोक हसे या संगणक अभियंत्याला अटक केली.
अशोक हा देहूरोडच्या क्रांती चौक गणेश कॉलनीत राहतो. त्याने फोन करून पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट असल्याचे सांगितले. या फोननंतर पोलिस यंत्रणा चांगलीच कामाला लागली. पोलिसांनी तातडीने आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवत अशोक हसे याला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने फोनमागचे कारण सांगितले. वसाहतीमधील लोकांच्या आवाजाला कंटाळून फोन केल्याचे म्हटले.
दरम्यान, अशोक हसे याच्याकडे चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी त्याने गैरवर्तन केले. त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की देखील केली. यावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.