मुंबई | चोरट्यांकडून कधी कोणाला त्रास होईल, कधी त्यांच्या निशाण्यावर कोण असेल याचा काही नेम नसल्याचाच प्रकार दादर रेल्वे स्थानकाजवळ घडला. या घटनेत देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचाच मोबाईल चोरण्याचा (Mobile Theft) प्रयत्न झाल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे. यातील विशेष बाब म्हणजे खुद्द माजी मंत्रिमहोदयांनीच चोरट्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
सुशीलकुमार शिंदे हे मुंबईतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या दादर रेल्वे स्थानकाजवळ होते. त्यावेळी त्यांचाच मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. मोबाईल चोरला जात असल्याची कल्पना शिंदे यांना आल्याने त्यांनी वेळीच चोरट्याला पकडले. त्यांनी चोराला रंगेहाथ पकडत पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील घाटणे गावची रहिवासी असल्याची माहिती दिली जात आहे.
दरम्यान, देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते असलेल्या शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाल्याने आणि हा मोबाईल चोर खुद्द शिंदे यांनीच पकडल्याने सर्वत्र एकच चर्चा आहे. या आरोपीने शिंदे यांचा मोबाईल का चोरला? यामागचा तपास पोलिसांकडून आता केला जाणार आहे.