मुंबई | ठाकरे आणि शिंदे गटाचा चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा वाद तात्पुरता संपुष्टात आला आहे. दोघांनाही स्वतंत्र्य नाव व निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या गटाला निवडणूक आयोगाकडून ढाल-तलवार हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.त्यामुळे आता भविष्यात महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटाची लढाई ही मशाल विरुद्ध ढाल तलवार अशी रंगताना दिसणार आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी रात्री शिंदे गटाला (Shinde Gat Symbol) बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं होतं. मात्र आता आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं आहे.
निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी सकाळी 10 वाजते पर्यंत पाठवायची होती. त्यानुसार शिंदे गटाने ई-मेल करत तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड ही चिन्हं निवडणूक आयोगाला (Election Commission) सादर केली होती. निवडणूक आयोगाने यापैकी ढाल तलवार हे चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे.