पुणे : मैं हूँ डॉन… रिम झिम गिरे सावन… सारा जमाना… बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या अशा एकाहून एक गाजलेल्या गाण्यांचे प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक आणि सहकाऱ्यांनी केलेले सादरीकरण आणि प्रसिद्ध मिमिक्री कलाकार शशिकांत पेडवाल यांची अमिताभ बच्चन यांच्या वेशभूषेतील उपस्थितीत लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई-स्कूळ पाषाणमधील विद्यार्थ्यांनी अमिताभ यांचा ८० वा वाढदिवस केक कापून साजरा केला.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा ई-स्कूल पाषाण येथे ‘हिट्स ऑफ अमिताभ बच्चन’ या गाण्यांच्या क्रार्यक्रमाचे आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. ‘रोते हुए आते है सब’, ‘मैं हूँ डॉन’, ‘देखाना हाय रे सोचा ना’, ‘कजरा रे…’ या गाण्यांना विद्यार्थ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांसह, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांची या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गाणी सुरु असतानाच मिमिक्री कलाकार शशिकांत पेडवाल यांनी अमिताभ बच्चन यांच्या वेशभूषेत कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावली. त्यावेळी खरेखुरे अमिताभ बच्चन आल्याचे विद्यार्थ्यांसह उपस्थितांना वाटले आणि एकच जल्लोष झाला. शशिकांत पेडवाल यांनी अमिताभ बच्चन यांचे गाजलेले डायलॉग बोलतानाच कौन बनेगा करोडपती मधील अमिताभ बच्चन यांची झलक सादर केली. उपस्थितांकडून त्यास जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे, माहिती व जनसंपर्क पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राजु पाटोदकर, निवृत्त कर्नल सचिन रंदाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक किरण दगडे, क्रिकेटपटू अनिल वाल्हेकर व राहुल कानडे, प्रा. नरहरी पाटील, प्राचार्या जया चेतवाणी, सादिक शेख, श्री चव्हाण, विलास कसबे, संदेश काथवटे, सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.