अकोला | एक 23 वर्षीय आजारी तरुण डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला होता. पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कारासाठी तिरडीवरून नेले जात होते. पण त्यावेळी हा तरुण अचानक उठून बसला. त्यामुळे गावकरी चांगलेच भयभीत झाले. ही घटना अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील विवरा गावात घडली.
प्रशांत मेसरे असे या तरुणाचे नाव आहे. तो पातूर तालुक्यातील विवरा गावात राहत होता. तो होमगार्ड सेवेत आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी सायंकाळी त्याला मृत घोषित केले. नातेवाईक व गावकऱ्यांनी त्याला गावात आणून अंत्यसंस्काराची तयारी केली होती. रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जात असताना प्रशांत अचानक उठून बसला. हा प्रकार पाहून गावकऱ्यांना धक्का बसला.
दरम्यान, प्रशांतला तेथील एका मंदिरात नेण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखे परिसरात पसरली. त्यामुळे प्रशांतला पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी उसळली होती. या प्रकारानंतर गावात एकच चर्चा सुरु असून, प्रशांतने तंत्र-मंत्राचा वापर केला असल्याची गावात चर्चा आहे.