मुंबई | राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या मुद्द्यावरून राजकारण तापत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना अटक करणाऱ्या पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची आता बदली करण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड करत चुकीचा इतिहास मांडला जात असल्याबाबत आक्षेप घेतला. याप्रकरणी त्यांनी ठाण्यातील चित्रपटगृहातील चित्रपटाचा शो सुद्धा बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही केल्याचा आरोप आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. याच प्रकरणात आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला.
दरम्यान, आव्हाड यांना अटक करणाऱ्या पोलिस अधिकारी डॉ. राठोड यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. राठोड यांच्या बदलीमुळे पुन्हा एकदा त्या प्रकरणाची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.