ग्वांगजू | ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स या मोसमातील अंतिम बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
पी.व्ही सिंधूने डाव्या घोट्याच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरी न झाल्याने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स मोसमातील अंतिम बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेत २०१८ ची चॅम्पियन सिंधू ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल खेळादरम्यान जखमी झाली होती. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल १४ डिसेंबरपासून चीनच्या ग्वांगझू येथे खेळवली जाणार आहे.
तिच्या डॉक्टरांनी तिला आणखी काही दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. जेणेकरून ती नवीन हंगामापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होईल. त्यांनी सर्व पैलूंचा विचार केला. ग्वांगजूमध्ये अनेक निर्बंध असून नवीन हंगाम लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती सिंधूचे वडील पीव्ही रामण्णा यांनी पीटीआयला दिली.
दरम्यान, तिने दोन आठवड्यांपूर्वी प्रशिक्षण सुरू केले आणि जानेवारीपर्यंत ती पूर्णपणे तंदुरुस्त होईल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तिने भारतीय बॅडमिंटन असोसिएशनला पत्र पाठवून आपल्या निर्णयाची माहिती दिली. सिंधूच्या माघारीचा अर्थ असा आहे की, या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ एचएस प्रणॉय भारताचे प्रतिनिधित्व करतील.