मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही. पुढील दोन दिवसात याबाबतचं पुढचं पाऊल काय असेल हे सांगितलं जाईल, असंही राऊत म्हटले आहेत.
माझ्या अटकेमागेही अशीच एक स्क्रिप्ट लिहिली गेली होती. “प्रत्येकवेळी कोणत्यातरी वादग्रस्त विधानावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपकडून स्क्रिप्ट लिहिली जात असते. यांचं सारं काही स्क्रिप्टेड असतं. मुंबईतून गुजराती, मारवाडी गेले तर हे शहर देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, मराठी माणसांना कुणी विचारणार नाही असं विधान याआधी याच राज्यपालांनी केलं होतं. त्यावेळी त्यावरुन जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मला अटक केली गेली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
जतवर दावा करुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर हल्ला केला आहे. यामागे मोठं षडयंत्र आहे. सरकार विरोधात संतापाची लाट आहे. राहिला प्रश्न सीमावादाचा तर महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. त्यासाठी पुन्हा महाभारत घडलं तरी चालेल. त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना सज्ज आहे, असंदेखील राऊत म्हणाले.
दरम्यान, शिंदे सरकारवर टीका करताना राज्यातलं खोके सरकार दिल्लीवरुन खोके आले तर हे महाराष्टालाही विकतील असा घणाघातही राऊतांनी केला आहे. त्यांना काही राज्याची पडलेली नाही. ते गुवाहटीला जाऊद्या, लंकेला जाऊद्या किंवा आफ्रिकेला जाऊद्या परंतु त्यांच महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयातून स्थान संपलंय. जनतेनं त्यांचं नाव केव्हाच आपल्या हृदयातून पुसून टाकलं आहे असेदेखील राऊत म्हणाले.