मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाजारांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी रोष व्यक्त करत भावनिक झाले होते. त्यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रतापदिनाचं महत्त्व वाढलं असतं, असे म्हटले आहे.
प्रतापगडावर आज 364 वा शिवप्रतापदिन सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यात उदयनराजे भोसले उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. छत्रपतींच्या अपमानाने त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांचे अश्रू म्हणजे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. शिवरायांचा अपमान सहन करण्यापेक्षा मरण का आलं नाही? ही उदयनराजेंची भावना म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रवासियांची भावना आहे.
दरम्यान, राज्य सरकारचा शिवप्रतापदिन सोहळा हे ढोंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठविण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व वाढलं असतं, असेही त्यांनी म्हटले आहे.