अमरावती | आतापर्यंत महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झाल्या नाहीत. जर महिला मुख्यमंत्री झाल्या तर अभिमानास्पद गोष्ट आहे. महिलांची शक्ती आता उद्धव ठाकरेंना दिसत आहे. आधी विरोधी पक्षनेतेपद महिलेला द्या, अशी मागणी खासदार नवनीत राणा (Navneet Kaur) यांनी केली आहे.
शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत विधान केले होते. त्यात त्यांनी शिवशक्ती, भीमशक्ती लहुशक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रिपदी बसवायचा आहे, असे म्हटले होते. त्यावरून राज्यात महिला मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर नवनीत राणा यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर एकटे डरकाळी फोडत आहेत. त्यांनी पहिले विरोधी पक्षनेतेपद द्यावे मग मुख्यमंत्रिपद द्यावे.
तसेच आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाहण्याचे स्वप्न पाहत आहात का? कोणतीही महिला मुख्यमंत्री झाली तरी अभिमान वाटेल. 50 पैकी 40 गेले आणि उद्धव ठाकरे खोटी आश्वासने द्यायला लागले आहेत, असेही त्या म्हणाल्या.