नवी दिल्ली | भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्याची सुविधा सरकारकडून दिली जात होती. त्यांच्याकडून तिकिटाची निम्मी रक्कम घेतली जात होती. मात्र, कोरोना महामारीनंतर ही सवलत पूर्णत: बंद करण्यात आली. त्यावर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही सवलत सध्यातरी दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे.
अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात दिल्या जाणाऱ्या सवलती पुन्हा कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ”सध्यातरी ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत देता येणार नाही. कारण प्रवाशांच्या सेवांसाठी 59,000 कोटी रुपयांचे अनुदान गेल्या वर्षी देण्यात आले होते. ही रक्कम इतकी मोठी आहे की, ते काही राज्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही जास्त आहे.
तसेच अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेचे वार्षिक पेन्शन बिल 60,000 कोटी रुपये आहे. पगार बिल 97,000 कोटी रुपयांचे आहे. त्यामध्ये इंधानावर 40,000 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. आम्ही गेल्या वर्षी 59,000 प्रवासी अनुदान दिले. त्यातून नव्या सुविधा मिळत आहे. जर काही नवे निर्णय घ्यायचे असतील तर आम्ही घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.