नवी दिल्ली | मुंबईतील दोन सख्या बहिणींनी सोलापुरातील अतुल आवताडे या तरुणाशी एकाच मंडपात लग्न केले. त्यावरून राज्यभरात चर्चा सुरु आहे. त्यानंतर आता या लग्नाचा मुद्दा थेट संसदेत उपस्थित करण्यात आला. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देशातील कायदे आणखी कठोर व्हायला हवेत, अशी मागणी केली.
रिंकी-पिंकी या दोन्ही उच्चशिक्षित तरुणींनी सोलापुरातील अतुल आवताडे या तरुणासोबत लग्न केले. या लग्नाची माहिती सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली. त्यानंतर नवनीत राणा यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्या म्हणाल्या, ”भादंवि ४९४, ४९५ हे कायदे सध्या अस्तित्वात आहेत. पण एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन मुलींशी विवाह करावा यासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक कायदे नाहीत. त्यामुळे यासाठी कायदा तयार केला पाहिजे आणि सोलापूरमध्ये ज्यांनी हा प्रकार केला त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे”.
दरम्यान, रिंकी-पिंकी आणि अतुल यांच्या विवाहाची चर्चा सुरु झाल्यानंतर या विवाहावर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच हा विवाह बेकायदा ठरवून यावर कारवाई करावी अशी मागणी करणारा तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता खासदार राणा यांनी ही मागणी केली आहे.
तरुण-तरूणींवर विपरीत परिणाम
सोशल मीडियावरून हा सर्व विषय देशभरात व्हायरल झाला. तरुण-तरूणींवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा. हिंदू संस्कृतीसाठी हा मोठा धक्का आहे. यापुढे असा प्रकार घडू नये आणि आपल्या संस्कृतीला गालबोट लागू नये, म्हणून कठोर कायदा तयार करण्याची आज गरज आहे. जेणेकरून पुन्हा कोणी असे धाडस करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.