मनसेच्या पाठिंब्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या
पुणे | पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वेसेवा आठवड्यातून एकदाच आहे. परंतु, ही रेल्वेसेवा दररोज सुरु करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ पुणेच्या वतीने आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु आहे.
अखिल राजस्थानी समाज संघ पुणे चे अध्यक्ष ओमसिंह भाटी म्हणाले की, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सुमारे ८ ते १० लाख राजस्थानी समाज वास्तव्यास आहेत. व्यापार, व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने राजस्थानहून पुण्यात आलेल्या नागरिकांना जोधपूरला जाण्यासाठी आठवड्यातून एकदाच रेल्वे आहे. त्यामुळे पुणे ते जोधपूर आणि जोधपूर ते पुणे ही रेल्वे दररोज सुरु करावी, या मागणीसाठी अखिल राजस्थानी समाज संघ आग्रही आहे. ही मागणी मान्य व्हावी यासाठी उपोषण केले आहे.
पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ उपोषण केले सुरु असून, यामध्ये राजस्थानी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘हमारी मांगे पुरी करो…’, ‘जोधपूर रेल्वे शुरु करो…’ यासारख्या घोषणा देण्यात आल्या.
विशेष म्हणजे आजपर्यंत परप्रांतीय समाजाच्या संदर्भात कठोर भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजस्थानी समाजाच्या पुणे ते जोधपूर या दररोज रेल्वे सुरू करण्याच्या मागणीस पाठींबा दर्शविला आहे. तसेच, या मागणीसाठी राजस्थानी समाजाने सुरू केलेल्या आमरण उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला आहे.
राजस्थानी समाजाच्या न्याय मागणीला पाठिंबा द्या : भाटी
राजस्थानी समाजाची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. आमचे हे उपोषण 20 जानेवारीपर्यत असणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीला जनआंदोलन केले जाणार आहे. आमच्यासोबत जे कोणी येतील त्यांचं आम्ही समर्थन घेणार आहोत. आज आम्हाला संख्या दाखवायची नाही. आज फक्त आमरण उपोषण आहे. मनसेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे ताकद वाढली आहे. आणखी कोणत्याही पक्षाने पाठिंबा दिला तर आम्ही घेऊ. आम्ही प्रत्येकवेळी तुमच्यासोबत असतो आता आम्हाला पाठिंबा द्या, असे अखिल राजस्थानी समाज संघ, पुणेचे अध्यक्ष ओमसिंह भाटी यांनी सांगितले.
…तर, राज ठाकरेंची भेट घेणार : साईनाथ बाबर
सध्या राजस्थानी समाजासाठी आठवड्यातून फक्त एकदाच रेल्वे आहे. पण ही रेल्वे दररोज सुरू करावी. राजस्थानी समाज कित्येक वर्षे पुण्यात राहतो. हा समाज मराठी मातीशी एकरूप आहे. त्यांची मागणी योग्य आहे. राजस्थानात अनेक पर्यटनस्थळे आहेत. पुण्यातील अनेक लोक राजस्थानला पर्यटनासाठी जातात. त्यामुळे ही रेल्वे सुरु करावी. या लोकांचं कोणी ऐकलं नाही तर आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार, असे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.