पुणे | शिवसेनेच्या बंडावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेमध्ये बंड होणार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आधीच माहिती होतं. त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील सांगितलं होतं असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
शिवसेनेचे आमदार का फुटले याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली. आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दिली असता माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली, असं पवार म्हणाले.
लोकशाहीत तोडाफोडीचं राजकारण फार काळ चालत नाही. लोक नक्कीच धडा शिकवतील. तिकडे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगही नुसत्याच तारखावर तारखा देतंय. खरंतर तिकडून न्याय मिळाला पाहिजे, असंही पवार म्हणाले.
विधान परिषदेच्या निकालाने सत्ताधाऱ्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. हा निकाल म्हणजे सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा म्हणता येईल. दुसरीकडे सत्यजीतला काँग्रेसने उमेदवारी दिली असती तर हे घडलं नसतं. विशेष म्हणजे शिक्षक वर्गाने हा निकाल दिला आहे.
दरम्यान, मागील वर्षी शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. एक दोन नव्हे तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाने नंतर राज्यात सत्ताही स्थापन केली.