पुणे | कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट यांना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा होत आहे.
हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे यांचा फोटो नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही. आणि विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट यांचेही नाव त्या मेसेज मध्ये नाही.
भाजपकडून या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले याविषयी आता जोरदार चर्चा होत आहे. गिरीश बापट आजारी असल्याने ते अनुपस्थित असणे समजू शकते परंतु, भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
वास्तविक कसबा पेठ विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. काकडे यांचा जन्म घोरपडी पेठेतला आहे. काकडे यांचे 22 वर्षे घोरपडी पेठेत वास्तव्य होते. त्यामुळं घोरपडी पेठेबरोबरच 7 व 9 नंबर कॉलनी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ यामध्ये काकडेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय कसबा पेठेतील मुस्लिम व दलित समाज देखील काकडेंना मोठ्या प्रमाणात मानतो.
गिरीश बापट हे विद्यमान खासदार आहेत. शिवाय त्यांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळं त्यांना देखील मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.
असे असून देखील भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. संजय काकडे आणि गिरीश बापट यांना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी देखील चर्चा होत आहे.