नागपूर । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सिरीज ९ फेब्रुवारी पासून खेळली जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आले आहेत .दोन्ही संघ या सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत.
ही मालिका जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने नागपूर खेळपट्टीवरुन गंभीर आरोप केले होते, ज्यावर रोहित शर्माने प्रतिक्रिया देताना त्यांची बोलती बंद केली. सामना सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया मीडिया किंवा खेळाडू हे नागपूरच्या खेळपट्टीवर आरोप करीत आहेत. ऑस्ट्रेलियन पत्रकाराच्या एका प्रश्नावर भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने याने त्यांना चोख उत्तर दिले.
खर तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात नागपूरची खेळपट्टी हा सर्वात मोठा मुद्दा ठरत आहे. खेळपट्टीबाबत अनेक तज्ज्ञांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पत्रकार परिषदेत रोहित शर्मालाही याबाबत विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्याने ऑस्ट्रेलियन मीडियाची मजा घेतली.यावेळी तो म्हणाला की, ”आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचे आहे. उद्या जे २२ खेळाडू खेळतील, ते सर्व दर्जेदार क्रिकेटपटू आहेत. त्यांना चांगले क्रिकेट खेळावे लागेल”. याचबरोबर रोहितने आपल्या चार फिरकी गोलंदाजांचेही कौतुक केले.