मुंबई | सध्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. नुकतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीचे काही वरिष्ठ नेते यांनी बंड करून मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले. त्यात दोन्ही गटाकडून आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणते नेते कोणत्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असा प्रश्न उपस्थित होतो.
त्याचबरोबर बारामतीमध्ये काय होणार याबाबत देखील राजकीय जाणकारांचे लक्ष लागून आहे. सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळणार का? बारामतीतून यावेळी कोण उभं राहणार असे प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
त्यावर राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) रोहित पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार असा सामना होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार निवडणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अजितदादा तशी भूमिका घेणार नाही. बारामती विधानसभेवर फक्त अजितदादाच निवडून येऊ शकतात, दुसरं कुणी नाही. अजितदादा कुटूंबाच्या बाबतीत तशी भूमिका घेणार नाहीत. तसेच अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही, माझ्या कुटूंबातील कुणीही निवडणुकीला उभं राहणार नाही, अजितदादांनी केलेल्या कामावर दादाच निवडून येणार, लोकसभेला पण कुणी कितीही प्रचार केला तरी सुप्रिया सुळे निवडून येणार’ असं रोहित पवार म्हटले आहे.