पुणे | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला अजित पवार यांच्या इतका प्रशासनावर पकड असणारा व मैत्रीला जागणारा दुसरा नेता नाही. अजित पवार म्हणजे कामाच्या बाबतीत ‘एक घाव दोन तुकडे’ करणारा नेता…, अशा शब्दांत अजित पवार यांच्या कार्याचं आणि त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचं भाजपाचे नेते व राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी कौतुक करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार यांच्याबद्दल बोलताना संजय काकडे म्हणाले की, अजित पवार यांचे नेतृत्व कुशल असून त्यांचे वक्तृत्व चांगले आहे आणि ते स्पष्टवक्ता आहेत. काटेकोर, नीटनेटकं काम करताना त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महाराष्ट्रात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
अजित पवार यांच्याशी पहिल्यांदा ओळख कधी झाली याबद्दल सांगताना काकडे म्हणाले की, प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या माध्यमातून १९९७ मध्ये अजित पवार यांच्याशी त्यांची ओळख झाली. संजय काकडे यांनी सोन्याचे दुकान सुरु करायचे ठरवले होते आणि त्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास निमंत्रण देण्यासाठी ते पहिल्यांदा अजित पवार यांना भेटले होते. तेव्हा सुरु झालेली त्यांची मैत्री आजही कायम असल्याबद्दल त्यांनी अजित पवार यांचे विशेष कौतुक केले आहे.
मित्रांना अजित पवार कधीच विसरत नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व त्यांच्या मित्रांच्या पाठीशी ते कायम उभे राहतात. कार्यकर्त्यांना ताकद देतात, असे सांगून संजय काकडे यांनी ज्या-ज्यावेळी त्यांना मदत लागली तेव्हा अजित पवारांनी त्यांना मदत केल्याचे आवर्जून सांगतात.
अजित पवारांच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना संजय काकडे म्हणाले की, १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार झालेल्या अजित पवार यांनी गेली ३२ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात भरीव योगदान दिले आहे. सलग सातवेळा विधानसभेत निवडून जाताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री म्हणून काम करताना स्वतःचा ठसा उमटवला आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागाची अजित पवारांना बारकाईनं माहिती आहे. शेती, सहकारसह, उद्योग-व्यापार आणि सर्वच क्षेत्राची त्यांना सखोल माहिती आहे. निर्णय घेऊन तत्काळ अंमलबजावणी करण्याची हातोटी त्यांच्यामध्ये प्रकर्षानं दिसते.
अजित पवारांच्या एका विशेष गुणाचंही संजय काकडे यांनी कौतुक केले आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांच्यात वक्तशीरपणा आहे. सकाळी सात वाजताच ते लोकांना भेटतात व कामाला लागतात. राज्याच्या पातळीवर काम करणाऱ्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य माणसाला सहज उपलब्ध होऊ शकेल अशा नेत्यांमध्ये अजित पवारांचे नाव सर्वात वरती असू शकतं. राज्यातला कोणताही व्यक्ती अगदी सहजपणे त्यांना भेटू शकतो, असंही काकडे म्हणालेत.
अजित पवारांच्या याच गुणांचा उपयोग महाराष्ट्राच्या भल्यासाठी होवो. त्यांच्या हातून राष्ट्राची-महाराष्ट्राची सेवा घडो आणि यासाठी त्यांना निरोगी उदंड आयुष्य मिळो! आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत अशा सदिच्छाही संजय काकडे यांनी दिल्या आहेत.