मुंबई | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या सुनावणी होणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेणार असल्याच सांगितलं त्यामुळे शिवसेनेच्या त्या 16 आमदारांचं काय होणार? यावर उद्या काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी का घेतली जाणार यावर स्पष्टीकरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी-20 परिषदेचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचं मला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं आवश्यक आहे असं म्हटलंय.
त्याचबरोबर मला या विषयात कोणतीही दिरंगाई करायची नाही, लवकर निर्णय घ्यायचा आहे. वेळ घालवायचा नाही म्हणून उद्याच सुनावणी करणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
निर्णय प्रक्रियेवर परिणाम होणार?
विरोधकांच्या आमदार सुनावणीबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला दिरंगाई करायची असती, वेळ काढायचा असता तर मी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं कारण सांगून सुनावणी पुढे ढकलली असती. पण मी सुनावणी आधीच घेतली. त्यामुळे मला वेळ काढायचाय की सुनावणी लवकर संपवायचीय हे तुम्हीच पाहा. माझ्यावर जी टीका होत आहे, आरोप केले जात आहेत. त्याचा हेतू काय हे मला माहीत आहे. पण अशा टीकेने माझ्या निर्णय प्रक्रियेवर फरक पडणार नाही. जे लोक टीका करत आहेत. त्यांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडायचा असेल त्यामुळे ते असं करत असावेत. अशा टीकेतून माझ्यावर कोणताही दबाव पडणार नाही. पडू देणार नाही. नियमानुसारच मी निर्णय घेईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र सुनावणी होणार का? यावर देखील उत्तर देत मला असे आदेश प्राप्त झाले नाहीत असं म्हटलं आहे. तर सुनावणी कशी घ्यावी, किती दिवसात घ्यावी, त्याची प्रक्रिया काय असावी हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. शेड्युल्ड 10 हा कायदा अधिक बळकट झाला आहे. या कायद्यात संशोधन करण्याची गरज आहे. योग्य ते बदल झाल्यास कायदा बळकट होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.