आघाडीवर मोहोळ, मुळीक अन्…
पुणे | येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपकडून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि पुणे शहर भाजपचे माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे शहराचे माजी महापौर आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर, तसेच फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर हे इच्छूक आहेत. यामध्ये मोहोळ आणि मुळीक यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे..त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या दोघांकडून अध्यात्मिक कार्यक्रमावर भर दिला जात आहे.
मॅरेथॉन महाआरोग्य शिबिर सत्संग अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा या इच्छुकांकडून केला जात आहे.
गेल्या महिन्यात मुरलीधर मोहोळ यांनी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेनिमित्त प्रसिद्ध वक्ते डॉ. कुमार विश्वास यांचा ‘ अपने अपने राम ‘ हा कार्यक्रम आयोजित केला होता. सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी गर्दी केली होती.
याच धर्तीवर आता येत्या शनिवारी 10 फेब्रुवारीला संगमवाडी येथे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील पुणेकरांसाठी ‘ राम कथा ‘ सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराची स्वप्नपूर्ती साकार झाल्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. विश्वविख्यात अध्यात्मिक प्रवक्ता जया किशोरी यामध्ये श्री राम कथा सांगणार आहेत. जया किशोरी यांचा हा महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम असल्याचा दावा केला जात आहे.
यापूर्वीही मुळीक फाउंडेशनने बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा यांच्या ‘ हनुमान कथा’ सत्संगाचे आयोजन केले होते. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी हजेरी लावली होती.
निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असताना आपल्या नावाची चर्चा पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये कशी राहील यासाठी इच्छुकांकडून हा प्रयत्न केला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत इच्छुक उमेदवारांमधील ही स्पर्धा अशीच सुरू राहिल अशी शक्यता नाकारता येणार नाही..